” संपर्कबाहेर असलेल्या गावांतील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळांमध्ये निवासाची व्यवस्था.”
दिनेश आंबेकर
जव्हार : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,जव्हार अंतर्गत येणाऱ्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.सततच्या पावसामुळे नदी-नाले भरून वाहत असून,अनेक गाव-पाडे संपर्काबाहेर गेले आहेत.यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर जव्हार प्रकल्प क्षेत्रात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. जव्हार मंडळात १९३ मिमी,साखरशेत मंडळात १४२ मिमी,तर जामसर मंडळात १३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे रस्त्यांची अवस्था खड्यात गेली असून,वाहतुकीवर परिणाम झाला आहे.तसेच वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे.या पार्श्वभूमीवर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,जव्हार यांच्यातर्फे महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.प्रकल्प अंतर्गत जे गाव-पाडे संपर्काबाहेर गेले आहेत,त्या ठिकाणांतील विद्यार्थ्यांसाठी जवळच्या आश्रमशाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
परिस्थितीवर सतत प्रशासनाचे लक्ष आहे.
प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.अपूर्वा बासुर यांनी पालकांना आवाहन केले आहे की,“ज्या विद्यार्थ्यांचा संपर्क तुटलेल्या भागांमध्ये अडकण्याचा संभव आहे,त्यांनी आपल्या मुलांना जवळच्या आश्रमशाळांमध्ये ठेवावे.यासाठी संबंधित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा.”प्रशासनाने परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून,आपत्तीजनक परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन प्रकल्प प्रशासनाने केले आहे