डहाणू प्रतिनिधी : सतेंद्र मातेरा.
वाचनवेल व सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानकवी ना. धो. महानोर काव्यमैफल या बहारदार कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील हौशी खगोल अभ्यासक व लेखक चंद्रकांत घाटाळ यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. डिंपल पब्लिकेशन प्रकाशित “बिन आडनावाची पोरी” व समिक्षा प्रकाशन, पंढरपूर प्रकाशित “अनुराधा इंदुलकर” या कादंबऱ्यांचे प्रकाशन सुप्रसिद्ध कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध लेखक व वक्ते प्रा. विवेक कुडू यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर लेखक चंद्रकांत घाटाळ यांनी आपल्या दोन्ही पुस्तकातील कथांचा थोडक्यात आढावा घेत वाचकांसमोर मांडला. यानंतर कविवर्य अरुण म्हात्रे यांनी आपल्या अनोख्या शैलीत लोकप्रिय कवींच्या कवितांचे सादरीकरण करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. याला पालघर जिल्ह्यातील वाचनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वांग्मय मंडळाच्या प्रा. दर्शना म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान वांग्मय मंडळाचे उद्घाटनही करण्यात आले. आभार प्रदर्शन वाचनवेलच्या सदस्या पारितोषिनी कुकडे पाटील यांनी केले. या वेळी TTFS अध्यक्ष विलास बेलकर, नवयुग संपादक रमाकांत पाटील, ॲड. सुनंदा बेलकर, प्रा. सुधीर भोईर, सुरज वावरे, शैलेश पाटील, मनिष घायाळ, अनुजा घाटाळ यांच्यासह अनेक मान्यवर व साहित्यप्रेमी उपस्थित होते. या बहारदार सोहळ्यामुळे पालघर जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ अधिक बळकट झाली असून, चंद्रकांत घाटाळ यांच्या नव्या साहित्यकृतींमुळे वाचनप्रेमींना नव्या कथांचा आस्वाद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.












