दिनेश आंबेकर
जव्हार : भारती विद्यापीठ इंग्लिश मिडियम स्कूल,जव्हार येथे आषाढी एकादशीचा पवित्र सण मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक मा.अर्जुन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दहावीचे वर्गशिक्षक योगेश कुलकर्णी यांच्या प्रेरणादायी शुभेच्छांने झाली.त्यांनी विद्यार्थ्यांना “फलाची अपेक्षा न करता कर्म करा,अंध-अपंगांना मदत करा आणि वैयक्तिक चरित्र जपा,” असा महत्वपूर्ण संदेश दिला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी सुदाम खिरारी यांनी विठ्ठलनामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे अध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले.तसेच दीपाली ठाकरे यांनी विठ्ठलाचे भक्तिगीत सादर करून वातावरण भक्तिमय केले.आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मिळून पारंपरिक ग्रंथदिंडी,नृत्य,भजन,फुगड्या आदी कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका लता नायकर यांनी केले.तर आयोजनाची जबाबदारी सांस्कृतिक विभागातील दीपाली ठाकरे,लीना जोशी,प्रणाली मुकणे आणि मेव्हीश शेख यांनी उत्तम प्रकारे पार पाडली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ललित घाडगे यांनी केले.कार्यक्रमात मोहन विटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या सांस्कृतिक उत्सवात मुख्याध्यापक,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालकवर्ग तसेच जव्हार-विक्रमगड परिसरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमात भक्तिभाव आणि सांस्कृतिक रंग भरलेला आनंददायी माहोल अनुभवायला मिळाला.