ट्रॉमा सेंटर व जिल्हा रुग्णालयासाठी उर्वरित निधीची तातडीने पूर्तता व्हावी.
दि :२४ जुलै २०२५ पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.हेमंत विष्णु सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उन्नतीसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडे ठोस मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.जगतप्रकाश नड्डा यांना सविस्तर निवेदन सादर केले.मनोर.ता.पालघर येथे २०० खाटांचे ट्रॉमा सेंटर – ₹५७ कोटी शिल्लक निधीच्या तत्काळ वितरणाची विनंती.तसेच रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ,तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची कमतरता लक्षात घेता,मनोर येथे प्रस्तावित ट्रॉमा सेंटर अत्यावश्यक आहे.या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने ₹१२० कोटींची प्रशासकीय मंजुरी दिली असून,यातील ₹६३ कोटींचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे. तथापि,उर्वरित ₹५७ कोटी निधी अद्याप वितरित झालेला नसल्यामुळे प्रकल्प रखडलेला आहे.या भागातील आदिवासी,तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तातडीची वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी हा निधी तात्काळ वितरित होणे आवश्यक आहे,असे खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.पालघर जिल्हा रुग्णालयासाठी वाढीव ₹१४८.२८ कोटी वित्तीय मंजुरीची मागणी तसेच महाराष्ट्र शासनाच्या २१ डिसेंबर २०२० रोजीच्या निर्णयानुसार पालघर येथे २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी ₹२०९.११ कोटींची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.तसेच नवीन DSR (2020-21) दरपत्रक,१८% जीएसटी आणि बांधकाम साहित्य दरवाढीमुळे एकूण प्रकल्प खर्च वाढून ₹३५७.३९ कोटी झाला आहे.या अनुषंगाने अतिरिक्त ₹१४८.२८ कोटी निधीसाठी वित्तीय मान्यता मिळवून देण्याची मागणी खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी केली आहे.“दोन्ही प्रकल्प तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे, जेणेकरून पालघर जिल्ह्यातील नागरिकांना आधुनिक आणि तत्काळ वैद्यकीय सेवा मिळू शकतील.भविष्यात उपचारासाठी मुंबई,ठाणे,वापी किंवा इतर रुग्णालयांमध्ये जावे लागू नये.नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळावा यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा चालू आहे.”अशी भूमिका खासदार महोदयांनी यावेळी मांडली.