पालघर – पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातील आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत कार्यरत असलेल्या सात आरोग्य पथकांमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचे डिसेंबर २०२४ ते मार्च २०२५ या चार महिन्यांचे वेतन अद्याप थकीत असून, गेल्या एक वर्षांपासून भविष्य निर्वाह निधी (पीएफ) सुद्धा जमा न झाल्याने संबंधित चालक व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
पालघर जिल्हा परिषदेने सदर रुग्णवाहिका सेवा ‘विनसोल सोल्युशन प्रा. लि., पुणे’ या खासगी कंत्राटदार संस्थेला दिली असून,सदर ठेकेदार यांना वेतन न मिळाल्याबाबत विचारणा केली असता, “पालघर आरोग्य विभागाकडून अनुदान (grant) मिळालेले नाही, त्यामुळे आम्ही वेतन अदा करू शकत नाही,” असे कारण कंत्राटदाराकडून सांगण्यात आले आहे.
या आर्थिक संकटामुळे वाहनचालकांचे जगणे कठीण झाले असून, अनेकांना कर्ज काढून घर चालवावे लागत आहे. अनेक चालकांचे पाल्य शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक भवितव्यही धोक्यात आले आहे. काही वाहनचालकांच्या पत्नी आजारपणामुळे अंथरुणाला खिळल्या असून, औषधोपचारासाठी देखील पैसा उरलेला नाही, असे चालकांनी सांगितले.
वाहनचालकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर थकीत वेतन आणि पीएफ बाबत ठोस निर्णय घेण्यात आला नाही, तर आम्ही सर्वच वाहन चालक काम बंद आंदोलन करण्यास भाग पडतील. त्यामुळे अत्यावश्यक रुग्णसेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील अशा उदासीनतेमुळे वाहन चालकांचे जीवन संकटात सापडत असून, याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.
