कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय)आणि डिजिटल कौशल्याद्वारे युवा सशक्तीकरणावर भर

जव्हार प्रतिनिधी-मनोज कामडी
जव्हार – जागतिक युवा कौशल्य दिन (वल्ड यूथ स्किल्स डे) हा दिवस दरवर्षी १५ जुलै रोजी साजरा केला जातो. तरुणांना २१व्या शतकातील बदलत्या औद्योगिक व तांत्रिक गरजांशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक कौशल्यांची जाणीव करून देणे, त्यांना सशक्त करणे हा या दिवसाचा प्रमुख उद्देश आहे.या पार्श्वभूमीवर भगवान बिरसा मुंडा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार येथे आज हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे माननीय प्राचार्य रोहन चुंबळे यांनी भूषवले. त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य शिक्षणाचे महत्त्व सांगताना बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला सतत अपडेट ठेवण्याची गरज अधोरेखित केली.कार्यक्रमासाठी जेराई फिटनेस चे प्रतिनिधी संकेत पोलादिया आणि मंगेश शेटे यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच ठाकूर इलेक्ट्रॉनिक्स, वसई या संस्थेचे HR अधिकारी जान्हवी कदम आणि विलास कदम यांनीही आपला मोलाचा सहभाग नोंदवला. या दोन्ही आस्थापनांनी संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांच्या निवडीसाठी आपली तत्परता दर्शवली.विशेषतः जान्हवी कदम यांनी वीजातंत्री, जोडारी व तारतंत्री या व्यवसायातील वरिष्ठ प्रशिक्षणार्थ्यांना ॲप्रेंटिसशिप संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन दिले. तसेच संस्थेतील संधाता व्यवसायात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी गोदरेज, विक्रोळी येथे केलेल्या ऑन-जॉब ट्रेनिंगनंतर त्यांना प्रशस्तीपत्रके प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेतील सर्व कर्मचारीवृंद, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्रितपणे परिश्रम घेतले. युवकांमध्ये नवे कौशल्य आत्मसात करण्याची जाणीव निर्माण करून संस्थेने एक सकारात्मक पाऊल उचलले.