
उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
पालघर – पालघर जिल्ह्यात डहाणू तालुक्यातील सुखडआंबा (ग्रा.पं. चळणी) शीरसोनपाडा येथे जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन निरागस मुलींना आपला जीव गमवावा लागला, तर एक मुलगी गंभीर जखमी झाली. ही हृदयद्रावक घटना १७ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता घडली होती. या दुर्घटनेवर १ जुलै रोजी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार विनोद निकोले यांनी लक्षवेधी सूचना मांडून सरकारला जाब विचारला.या लक्षवेधीवर उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्या उपअभियंता आर.आर. पाटे आणि कार्यकारी अभियंता बी. के. शिंदे यांचे तात्काळ निलंबन केल्याचे विधानसभेत जाहीर केले. तसेच संबंधित ठेकेदार हरिश बोरवेल्सला काळ्या यादीत टाकण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पीडित कुटुंबांना अधिक मदत मिळण्यासाठी शिफारस करण्यात येईल, असे आश्वासन दिले. सध्या शिक्षण विभागामार्फत प्रत्येकी दीड लाख रुपयांची तात्पुरती मदत देण्यात आली आहे. मात्र ती अपुरी असून, ती वाढवावी अशी मागणी आमदार निकोले यांनी ठामपणे मांडली.
ही घटना जलजीवन मिशन योजनेतील भ्रष्टाचार, हलगर्जीपणा आणि गुणवत्तेच्या अभावाचे दुर्दैवी उदाहरण ठरली आहे. “केवळ एका गावातील घटना नाही, तर ही संपूर्ण यंत्रणेच्या निष्काळजीपणाची शोकांतिका आहे,” असे मत आमदार निकोले यांनी मांडले. शासनाने अशा प्रकारच्या योजनांमध्ये गुणवत्तेवर भर देत काटेकोर देखरेख ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
चौकट-
आमदार निकोले यांनी तीन ठळक मागण्या अधिवेशनात मांडल्या:
- जबाबदार अभियंत्यांचे तात्काळ निलंबन,
- मृत मुलींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये व जखमी मुलीच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत,
•निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे.