संपादक : दिनेश आंबेकर
जव्हार : जागतिक खेळ दिवसाचे औचित्य साधून जव्हार तालुक्यातील विविध गावांमध्ये JSW व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ECE (अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन) उपक्रमांतर्गत अंगणवाड्यांमध्ये भव्य खेळ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्यांत विविध प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला होता.मोठ्या गटाचे खेळ,बैठक खेळ, काल्पनिक खेळ,संगीतावर आधारित खेळ,शारीरिक खेळ,मुक्त खेळ, कविता,गोष्टी आणि कल्पनाशक्तीवर आधारित अनेक खेळ मुलांनी आणि नागरिकांनी अनुभवले.यामध्ये पारंपरिक तसेच आधुनिक खेळांची रंगतदार स्पर्धा पार पडली.खो-खो, कबड्डी,लंगडी,रस्सीखेच,सायकल शर्यत,मटकाफोड,लिंबू-चमचा शर्यत, धावण्याच्या शर्यती यांसारखे खेळ आयोजित करण्यात आले होते. यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून त्यांना विविध खेळांतील कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली.या कार्यक्रमात गावातील सरपंच, शिक्षक,अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा वर्कर्स,स्वयंसेवक, विद्यार्थी तसेच मोठ्या प्रमाणात माता-पित्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांना मुलांच्या सर्वांगीण विकासात खेळांचे महत्त्व सांगण्यात आले.हा उपक्रम खेळाच्या माध्यमातून बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकासाला चालना देणारा ठरला असून ग्रामस्तरावर खेळ संस्कृती रुजविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरतो आहे.