बचावाची शक्यता अत्यंत कमी

उपसंपादक – प्रशांत दाव्हाड
मुंबई – अहमदाबाद, १२ जून २०२५: एअर इंडियाचे अहमदाबादहून लंडनकडे जाणारे AI171 हे प्रवासी विमान गुरुवारी सायंकाळी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झाले. विमानात २४२ प्रवासी होते. अपघातानंतर पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, बचावाची शक्यता अत्यंत क्षीण असल्याची माहिती पोलिस आयुक्त जी.एस. मलिक यांनी दिली आहे.विमान एका निवासी भागात आणि मेडिकल कॉलेज परिसरात कोसळल्यामुळे केवळ प्रवासीच नव्हे, तर जमिनीवरील नागरिकांच्याही मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये आकाशात दाट काळ्या धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसून येत आहेत.या भीषण दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही विमानात होते, अशी माहिती असून, त्यांच्या स्थितीबाबत अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. मात्र माजी उपपंतप्रधान एम. व्यंकय्या नायडू यांनी रुपाणी यांच्यासोबतच्या प्रवासाची पुष्टी केली आहे.
विमान कोसळलेले ठिकाण नागरी वसाहतीच्या जवळ असून, अहमदाबाद पोलिसांसह NDRF व अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले आहे. स्थानिक हॉस्पिटल्सना अलर्ट करण्यात आले असून, आपत्कालीन रक्तसाठा आणि वैद्यकीय व्यवस्था उभी करण्यात येत आहे.
संपूर्ण देशभरातून या दुर्घटनेवर हळहळ व्यक्त केली जात असून, पंतप्रधान आणि इतर नेत्यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेतला आहे.