जव्हार तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांचा निधी गेल्या दीड वर्षापासून रखडला आहे. रोजगार हमी योजनेमध्ये कुशल व अकुशल असे कामाचे दोन भाग असतात अकुशल काम हे मजुरांकडून केले जाते, तर कुशल काम हे पुरवठादार ठेकेदारांकडून केले जाते. या कुशल कामांमध्ये गावपाड्यातील अंतर रस्ते कॉंक्रिटीकरण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे याचा समावेश असतो, ही कुशल कामे सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत विभाग यांच्यामार्फत केली जातात, ही कामे आर्थिक वर्ष सन २०२३ ते २०२४ सालात करण्यात आली होती ,मात्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने हा निधी दिला जात नसल्याने पुरवठादार, ठेकेदार रडकुंडीला आले आहेत. या कामाच्या निधीची मागणी तहसील कार्यालयामार्फत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली जाते.जिल्हाधिकार्यांकडे ही मागणी गेल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून आयुक्त कार्यालय रोजगार हमी योजना नागपूर विभागाकडे या निधीची मागणी केली जाते.३१ मार्च २०२५ रोजी हा निधी येईल अशी आशा या पुरवठादारांना,ठेकेदारांना होती. मात्र ३१ मार्च २०२५ रोजी शासनाकडे निधी नसल्यामुळे कुशल कामांना फुटकी कवडी सुद्धा मिळाली नाही.सार्वजनिक बांधकाम विभागाचा कुशल कामाचा निधी गेल्या दिड वर्षांपासून २२,३७,५६,८३७ इतका रखडला आहे. तर ग्रामपंचायत विभागाचा ७,१९,९७,२३६ इतका निधी रखडला आहे. हा निधी मिळत नसल्याने पुरवठादार, ठेकेदार कर्जबाजारी झाले आहेत.
तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाची कामे पूर्ण होऊन दीड वर्ष होऊन लाभार्थ्यांना निधी मिळालेला नाही. रेशीम विभागाचा ६,२३,७८९ इतका निधी रखडला आहे., सामाजिक वनीकरण विभागचा ६५,८२,४१४ इतका निधी रखडला आहे.,कृषी विभागचा २२,५९,६१६ इतका निधी रखडला आहे.,वन विभागाचा ४,०७,३७९ इतका निधी रखडला आहे. सर्व विभागाचा एकूण निधी ३०,५६,२७,२७२ शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्रलंबित आहे.हा निधी मिळण्यासाठी किती वर्ष लागतील हे गुलदस्त्यातच आहे.या बाबत रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी विजया जाधव यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पुर्ण माहिती घेऊन मगच प्रतिक्रिया देईन असे सांगितले.
जाहिरातीसाठी संपर्क:
मुख्य संपादक – दिनेश आंबेकर – 9022059782